कणकवली पोलिसांनीही मानले आभार
कणकवली:
वास्तविक ‘त्या’ दोघीही ‘लॉकडाऊन’मुळे येथे अडकल्या. पण, या कटू दिवसांतही त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. अर्थातच ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यापासून पोलिसांच्या सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी स्वीकारलेल्या या दोघींचे मनापासून आभार मानायला पोलीसही विसरले नाहीत.
मूळ सिंधुदुर्गातील देवगड येथील व सध्या अंधेरी-मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या शुभांगी फाटक या आपल्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी कलमठ (ता. कणकवली) येथे आल्या होत्या. शुभांगी यांच्यासमवेत अंधेरी येथील सुखमन कौर (मूळ पंजाब) ही मुलगी राहायला असून तीही त्यांच्यासमवेत कलमठ येथे आली होती. नेमक्या याच सुमारास ‘लॉकडाऊन’ झाले अन् दोघींनाही येथेच अडकून पडावे लागले.
‘लॉकडाऊन’मुळे कणकवलीतील पोलिसांना भर उन्हात नाश्ता, जेवणाचाही विचार न करता डय़ुटी करावी लागत असल्याचे शुभांगी यांच्या लक्षात आले. त्यांनी सुखमन हिच्या साथीने रोज पोलिसांसाठी नाश्ता बनवायला सुरुवात केली. या दोघींच्या या अनोख्या आदरातिथ्याने पोलीसही भारावले. अखेरीस नुकतीच मुंबई गाठण्याची परवानगी मिळाल्याने या दोघींनी पोलीस ठाणे गाठत पोलिसांची भेट घेतली. यावेळी दोघींच्या अनोख्या मदतीबद्दल पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी व पोलिसांनीही त्यांचे आभार मानत पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. पोलीस नीलम पवार, विश्वजीत परब, रमेश नारनवर, दीपा पाटील आदी उपस्थित होते.