ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
लॉकडाऊन काळात सोसायटीतील महिलांसोबत गरबा खेळल्याप्रकरणी अहमदाबाद ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
अनिला ब्रह्मभट्ट असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून, त्या बोपाल पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून महिला पोलीस अधिकाऱ्याने रहिवाशी सोसायटीतील महिला आणि इतर सहकाऱ्यांसोबत गरबा खेळला.
लॉकडाऊनमुळे कंटाळलेल्या लोकांचे मन रिझवण्यासाठी एका स्थानिक पोलीस ठाण्याने गायकांना पाचारण केले होते. त्यावेळी हा सामूहिक गरबा खेळण्याचा प्रकार घडला. सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती अहमदाबाद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आर. व्ही. असारी यांनी दिली.