अग्गंबाई सासूबाई मालिका अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत. या मालिकेतील शेफ अभिजित राजे म्हणजेच अभिनेते डॉ. गिरीश ओक लॉकडाऊनमध्ये घरी कसा वेळ घालवतात आहेत हे जाणून घायची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
अग्गंबाई सासूबाई मालिकेचं चित्रीकरण, नाटक सातत्याने सुरू असल्याने आता टाळेबंदीच्या काळात घरात काय करायचे, असा प्रश्न डॉ. गिरीश ओक यांच्या पुढे होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, घरातील कामं मी आवडीने करतो त्यामुळे सुरुवातीला घरातली कामे वाटून घेतली. या काळात स्वत:तली सकारात्मकता टिकून राहणे गरजेचे असल्याने वाचन, गायन आणि कुटुंबीयांसोबत विविध विषयांवर गप्पा मारणे सुरू असते. जगातील घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसातील 1 तास मी बातम्या ऐकण्यासाठी देतो. त्याचसोबत माझे आवडते लेखक नारायण धारप यांच्या पुस्तकांचे वाचन सध्या मी करतोय. त्यांचे समग्र साहित्य मी घरी आणले होते. त्यांच्या भयकथा, रहस्यकथा प्रसिद्ध आहेत, पण उत्तररंग हे पुस्तक काहीसे विशेष आहे. सध्या सुरू असलेल्या अग्गंबाई सासूबाई या मालिकेप्रमाणेच याही पुस्तकात उतारवयातील विवाह चितारला आहे. सध्या या पुस्तकाचे वाचन सुरू आहे.