लॉकडाउन म्हटलं की आता प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिवसरात्र घरी बसून राहिल्याने येणारा कंटाळा दिसत आहे. पण सध्या तरी या नियमाला इलाज नाही. पण लोकांचा लॉकडाउनमधील कंटाळा घालवण्याचे काम सेलिब्रिटी कलाकार मंडळी करत आहेत. यामध्ये अभिनेता संतोष जुवेकर याने बाजी मारली आहे. सध्या संतोषची चर्चा आहे ती लॉकडाउनमध्ये त्याने सोशल मीडियात शेअर केलेल्या एका विनोदी पोस्टची. या लॉकडाउनमध्ये मी इतका घरकोंबडा झालोय की घरातले कधीतरी मलाच शिजवून खातील की काय असं वाटू लागलयं अशी पोस्ट करत सोबत संतोषने एक होम लूकमधला फोटोही पोस्ट केला आहे. संतोषची ही पोस्ट म्हणजे सध्या लॉकडाऊनमध्ये घरी बसून असलेल्या प्रत्येकाच्या मनातील भावना असल्याने ही पोस्ट प्रचंड व्हायरल तर होते आहेच पण संतोषच्या या मिश्किल बोलण्यावर त्याचे चाहते मात्र चांगलेच फिदा झाले आहेत.
लॉकडाउन सुरू झाला तेव्हा जे शूटिंगनिमित्त महाराष्ट्राबाहेर गेलेले नाहीत ते कलाकार काय करत असतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली. संतोषने यावर कडी करत स्वतःलाच घरकोंबडा म्हटले आहे. मध्यंतरी संतोषने त्याचे केस वाढवले होते आणि त्यावरही कोपरखळी करत फॉलोअर्सचे मनोरंजन केले
होते.
काही महिन्यांपूर्वी संतोष डेट भेट या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला होता. त्या प्रवासातील अनेक भन्नाट किस्से आणि फोटो शेअर केले होते. संतोष आणि त्याच्या फोटोओळी यांची ही भन्नाट केमिस्ट्री आता पुन्हा लॉकडाउनमधला घरकोंबडा या फोटोमध्येही दिसत आहे. संतोषने पोस्ट केलेला फोटो आणि त्याची कॅप्शन हे खरच सध्या घरी बसलेल्या अनेकांच्या आयुष्यातील सत्य आहे. त्यामुळेच संत्या, तू तर आमच्या मनातलं बोललास रे अशीही प्रतिक्रिया त्याला आली आहे.
संतोषच्या सोशलमीडिया पेजवरील फोटो पाहण्यासोबत त्याने त्यांना काय कॅप्शन दिलीय हे पाहणं खूपच रंजक असतं. जेव्हा संतोष डेट भेट या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला तेव्हाही या सिनेमाचा दिग्दर्शक आणि मित्र लोकेश गुप्ते याला त्याने खूप धन्यवाद दिले होते. संतोष म्हणाला होता की, लंडन हे माझं ड्रीम डेस्टीनेशन आहे. पण यापूर्वी मी हे स्वप्नच पाहत होतो. आता या सिनेमातील संधी आणि लंडन भटकंती अशी डबल ट्रिट मला लोकेशने दिली. या सिनेमात त्याच्यासोबत सोनाली कुलकर्णीही दिसणार आहे. तिच्यासोबतच्या फोटोंनाही संतोषने हटके कॅप्शन दिल्या होत्या. संतोषच्या अनेक छंदापैकी त्याला स्वयंपाक करण्याचीही आवड आहे, त्यामुळेच त्याच्या पोस्टमधल्या घरकोंबडा आणि घरातले मलाच शिजवून खातील या दोन शब्दांनी सोशलमीडिया वर्तुळात हशा पिकवला आहे.