वृत्तसंस्था/ लिस्बन (पोर्तुगाल)
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही क्रीडापटूंचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असून अनेक दिग्गज खेळाडू कोरोनाविरुद्ध लढय़ात आपले मोलाचे योगदान देत आहेत. यामध्ये पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो मात्र वेगळय़ाच कारणामुळे चर्चेत आला आहे. पोर्तुगालची राजधानी लिस्बनपासून काही अंतरावर असलेल्या मॅडेरिया येथील एका स्टेडियममध्ये लॉकडाऊन दरम्यान रोनाल्डो सराव करताना दिसून आला आहे. संपूर्ण जग कोरोनामुळे भीतीच्या छायेत असताना लॉकडाऊनचे नियम मोडल्याने रोनाल्डोवर टीका होत आहे.
सध्याच्या घडीला कोरोनाचा फटका युरोपमधील पोर्तुगाल, स्पेन, इटली, इंग्लंड या देशांना मोठय़ा प्रमाणावर बसला आहे. पोर्तुगालमध्येही अनेक बळी गेले असून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या दरम्यान, मॅडेरिया येथील नॅशनल स्टेडियमवर रोनाल्डो सराव करताना आढळला. शनिवारी रोनाल्डो व त्याचे सहकारी याठिकाणी काही काळ सराव केला. यादरम्यान स्थानिक आरोग्य अधिकाऱयांना याची माहिती मिळताच सराव थांबवण्यात आला. या सरावाचे फोटो सोशल मेडियावर व्हायरल झाले आहेत.
कोरोनाच्या जोरदार प्रसारामुळे जगातील सर्वच फुटबॉल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी सर्वच खेळाडू घरीच थांबले असून रोनाल्डोही याला अपवाद नाही. पण, शनिवारी लॉकडाऊन असताना रोनाल्डोने नियम मोडत सराव केला आहे. यासंदर्भात मेडिरियाचे आरोग्यधिकारी रामोस यांनी रोनाल्डोला सरावासाठी कोणताही विशेषअधिकार दिला नसल्याचे स्पष्ट केले. त्याने अन्य नागरिकांच्या प्रमाणे नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनापरवाना सराव केल्याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने समज दिली आहे. याशिवाय, कोणताही दंड त्याच्याकडून आकारला गेलेला नाही.