आरोग्य संघटनेचा इशारा,
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील लॉकडाऊनला सूट देण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमध्ये सूट अथवा काही सवलती दिल्यास कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याची भीती व्यक्त केली आहे. लोकांची वर्दळ वाढल्यास पुन्हा बाधितांची संख्या वाढू शकते, असा इशाराही दिला आहे.
भारत सरकारने अर्थव्यवस्थेला गती देण्याकरता काहीअंशी सवलती देत उद्योग सुरु करण्याबाबत विचार सुरु केला आहे. काही ठिकाणी सुरुही करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे पश्चिम प्रशांत विभागाचे क्षेत्रीय निदेशक डॉ. ताकेशी कासेई यांनी चिंता व्यक्त केली आहे. लॉक डाऊनमध्ये याक्षणी ढिलाई आतापर्यंतच्या लढय़ावर पाणी सोडणारी ठरेल, असे ते म्हणाले.भविष्यात संक्रमणाचा धोका रोखण्यासाठी अशा सवलती देणे चुकीचे ठरणार आहे. सोशल डिस्टन्सींग अत्यावश्यक बाब असल्याचेही ते म्हणाले. त्याकरता लॉकडाऊन एकदम अथवा 50 टक्क्यांहून अधिक सवलती देत उठवणे चुकीचे पाऊल ठरु शकते, असे डॉ. कासेई यांनी म्हटले आहे.