प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन जारी करण्याचा सरकारचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून आपल्याशी याविषयी चर्चा केली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांचीही बैठक घेऊन सल्ले घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले.
मंगळवारी पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. आपण विविध खात्यांमधील अधिकाऱयांशी चर्चा करत आहे. पंतप्रधानांनी देखील कोरोना नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याची सूचना केली आहे, असे ते म्हणाले.
बिदर जिल्हय़ाच्या बसवकल्याण येथे जातनिहाय प्रचारसभा घेत असल्यासंबंधी आरोप झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना येडियुराप्पा म्हणाले, आपण जातनिहाय प्रचारसभा घेतलेल्या नाहीत. काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना आपल्यावर आरोप केल्याशिवाय चैन पडत नाही, असा टोला लगावला.
तीन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचाच विजय होणार आहे. दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण प्रचार केला आहे. बुधवारी बेळगाव आणि गोकाकमध्ये प्रचार करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.