1 एप्रिल ते 15 जून या कालावधीत अबकारी खात्याला 4,500 कोटींचा महसूल
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जारी केल्यामुळे अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. मात्र, लॉकडाऊन कालावधीतही अबकारी खात्याला मद्यविक्रीतून अधिक महसूल मिळाला आहे. अबकारी मंत्री के. गोपालय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल ते 15 जून या कालावधीत मद्यविक्रीतून 4,500 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. सामान्य दिवसांपेक्षा हे प्रमाण 10 टक्के अधिक आहे.
बेंगळूरमधील महालक्ष्मी लेआऊट येथे लसीकरण मेळय़ाला चालना दिल्यानंतर अबकारी मंत्री के. गोपालय्या यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊन जारी असताना देखील अपेक्षेपेक्षा अधिक अबकारी उत्पन्न मिळाले आहे, असे ते म्हणाले.
लॉकडाऊन कालावधीत सकाळी 6 ते 10 या कालावधीत मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली होती. केवळ पार्सल नेण्याची मुभा असली तरी मद्य खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या टप्प्यातील अनलॉकची घोषणा झाल्यानंतर निवडक 19 जिल्हय़ांमध्ये मद्यविक्रीसाठी दुपारी 2 पर्यंत मुभा देण्यात आली होती. त्यामुळे 1 एप्रिल ते 15 जून या कालावधीत मद्यविक्रीतून 4,500 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.