वार्ताहर/ मालवण
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. सध्या जिल्हय़ात सर्वत्र संचारबंदी आहे. लॉकडाऊन कालावधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही घटले आहे. गेल्या आठवडय़ाभरात मालवण पोलीस ठाण्यात केवळ दोन गुन्हय़ांची नोंद झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात सर्वत्र संचारबंदी आहे. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी नागरिक व ग्रामस्थ घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. मालवण पोलीस ठाण्यात आठवडय़ाभरात सर्जेकोट व कांदळगाव येथील अवैध दारू विक्रीच्या दोन गुन्हय़ांची नोंद झाली आहे. मालवण पोलीस ठाण्यात आठवडय़ाभरात हाणामारी, कौटुंबिक वाद, चोरी तसेच गंभीर स्वरुपाचे कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाहीत. मालवण पोलीस ठाण्यात आठवडय़ाभरात अदखलपात्र गुन्हय़ांचीही नोंद झाली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली आहे.