ऑनलाईन टीम / चंडीगड :
हरियाणामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याची घोषणा सरकारने नुकतीच केली होती. त्यानंतर हरियाणा सरकारने सोमवारी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
मनोहर लाल खट्टर सरकारने राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 5 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. कडक निर्बंधांमुळे गरीब जनतेच्या उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल वीज यांनी सोमवारी सांगितले की, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 5 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण त्याची रोजी – रोटी बंद झाली आहे. कोविडमुळे त्यांच्या हाताला काम नसून त्यांना घरी बसावे लागत आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, राज्यातील रुग्ण संख्या वाढल्याने 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. हरियाणा सरकारने या महामरीचा उल्लेख ‘महामारी अलर्ट, सुरक्षित हरियाणा’ असा केला आहे. तसेच या महामारोचे गंभीर स्वरूप लक्षात घेत कोरोना रोखण्यासाठी आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील सरकारकडून करण्यात आले आहे.