प्रतिनिधी/ निपाणी, चिकोडी
कोरोना विषाणूशी फैलावणारी साखळी तोडण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी लॉकडाऊनच्या सहाव्या दिवशी निपाणी, चिकोडी, संकेश्वर परिसरात शुकशुकाट दिसून आला. यातच कर्नाटक सरकारने सीमाबंदीची घोषणा केल्याने प्रशासन अधिकच अलर्ट झाले आहे. तसेच कर्नाटक व महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने प्रशासनास नाईलाजास्तव लॉकडाऊनचा विळखा अधिकच घट्ट करावा लागत आहे. त्याला नागरिकांनीही सहकार्य करून घरीच थांबावे, असे आवाहन केले जात आहे.
संसर्गजन्य रोग असल्याने कोरोनाचा फैलाव गतीने होत चालला आहे. त्यामुळे काटेकोर उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. घराबाहेर पडणाऱया अनेकांना पोलिसांचा मार सहन करावा लागत आहे. इतके होऊनदेखील नागरिकांची वर्दळ काही ठिकाणी दिसूनच येत असल्याने निपाणी पोलिसांकडून रविवारपासून गाण्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
फक्त अत्यावश्यक वाहनांना प्रवेश
दोनचाकी, चारचाकी तसेच चालत येणाऱया नागरिकांना परत पाठविण्यात येत आहे. अत्यावश्यक वाहने, रुग्णवाहिका, सेवेत असणारे डॉक्टर, पोलीस, पत्रकार, वृत्तपत्र वाहतूक करणारी वाहने यांच्याशिवाय अन्य कोणालाही कर्नाटक-महाराष्ट्रात प्रवेश दिला जात नाही. प्रवाशांना फाटय़ावर अडवून परत पाठविताना पोलिसांची दमछाक होत आहे. सध्या आंतरराज्य वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.
प्रवाशांवर उपाशी राहण्याची वेळ
निपाणीकडे जाणाऱया सेवा रस्त्याच्याशेजारी तसेच महाराष्ट्रातील कागलपर्यंत रस्त्याशेजारी अनेक नागरिक आपली गाडी लावून बसले आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱया गावातून अशा लोकांना चहा, नाष्टा, पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. लांब पल्ल्याच्या येणाऱया व जाणाऱया प्रवाशांवर उपासमारीची वेळ आली आहे. खिशात पैसे असून देखील खायला काही मिळत नसल्याने लोक हतबल झाले आहेत.
नवव्या दिवशीही चिकोडी शांत
गेल्या 9 दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोनाला थोपविण्यासाठी पुकारलेल्या जमावबंदीला चिकोडीत प्रतिसाद मिळत आहे. नागरिकच स्वयंस्फूर्तीने घरात असल्याने पोलिसांवरील ताण कमी झाल्याचे दिसत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार, व्यवसाय बंद करून कायद्याच्या अंमलबजावणीचे पालन नागरिकांकडून होत आहे. शहरात मेडिकल, किराणा, दूध संकलन केंदे व दवाखाने सुरू आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा एकच उपाय असल्याने सर्वांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला जात आहे. घराघरात कॅरम, बुद्धिबळ, टी.व्ही., मोबाईल गेम खेळण्यामध्ये युवा वर्ग गुंतला आहे. तर वयोवृद्ध नागरिक कथा, कादंबऱया वाचण्यात तर महिला घरातील कामे करण्यात मग्न आहेत.