खासदार राऊत यांच्याकडून दोडामार्ग तालुक्याचा आढावा : योग्य समन्वयामुळेच जिल्हा कोरानामुक्त
वार्ताहर / दोडामार्ग:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाची ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनकडे वाटचाल सुरू असून जिल्हय़ातील सर्व नागरिक, प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग यांच्या योग्य समन्वयामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, असे असले तरी लॉकडाऊन संपल्यानंतर सर्वांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यावेळी खरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केली.
दोडामार्ग तहसील कार्यालयात राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी तहसीलदार मोरेश्वर हाडके, पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, गटविकास अधिकारी मिलींद जाधव, शिवसेनचे जिल्हाप्रमुख संजय पडते, गटनेते नागेंद्र परब, विक्रांत सावंत, भंडारी समाज तालुकाध्यक्ष कृष्णा पालयेकर, तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, भगवान गवस, संतोष मोर्ये, रामदास मेस्त्राr, लक्ष्मण आयनोडकर आदी उपस्थित होते.
राऊत पुढे म्हणाले, दोडामार्गात सुद्धा प्रशासन, आरोग्य व पोलीस यंत्रणा यांचे चांगले काम असून काही प्रमाणात येथे अडचणी निर्माण झाल्या आहेत. नागरिकांच्या सहकार्यामुळेच तसे काहीही नव्हता. परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला मास्क, सॅनिटायझरशिवाय अन्य तत्सम वस्तू लवकरच मोठय़ा प्रमाणात पुरविले जाणार आहेत. तालुक्यातील काही अडचणीत असलेल्या ‘त्या’ एक हजार 900 कामगारांना देखिल सुरळीत धान्यपुरवठा लवकरच केला जाईल. आरोग्यविषयक सोयी-सुविधा देखिल सर्वांना दिल्या जातील, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी तालुक्यातील माकडतापाच्या समस्येबाबतही आरोग्य विभागाकडून माहिती जाणून घेतली. सर्वांनी सुरक्षित अंतर ठेऊन लॉकडाऊन पाळावे, असेही त्यांनी सांगितले.