प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात सध्या जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ नसून हे लॉकडाऊन 8 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी दिली. तसेच नव्याने तीन ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. सद्यस्थितीत 69 रुग्ण कोरोना सक्रिय असून 36 संशयित रुग्ण आयसोलेशन वार्डमध्ये दाखल आहेत, अशी माहिती शुक्रवारी देण्यात आली.
या लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वैद्यकीय अस्थापना या पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. त्यामध्ये औषध दुकानांचाही समावेश आहे. तसेच जिल्हय़ातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने जिल्हावासीयांच्या भल्यासाठीच लॉकडाऊन केले आहे. या काळात नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य ते पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
जिल्हय़ात कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या 69
जिल्हय़ात आतापर्यंत 229 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 154 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून एक रुग्ण मुंबईला गेला असल्याने सद्यस्थितीत कोरोना सक्रीय 69 रुग्ण आहेत तसेच 36 संशयित रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिल्हय़ात नव्याने तीन कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. एकूण 108 कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले. पैकी 84 झोन शिथील करण्यात आले असून सध्या 24 कंटेनमेंट झोन आहेत.
तीन नवे कंटेनमेंट झोन
कणकवली तालुक्मयातील लोरे नं. 1 येथील सत्यवान अरुण गुरव रा. लोरे नं. 01 शिवगंगावाडी (Loction 16.398756N,73.7681716E) यांचे घर ते 500 मीटर परिसरातील 34 घरे, 43 कुटुंबे, 172 लोकसंख्या असणारा सर्व परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच आवळेश्वर येथील संजय वासुदेव तोरस्कर रा. आवळेश्वर-तांबडवाडी (Loction 16.449491N,73.6909933E) यांचे घर ते 100 मीटर परिसरातील 50 घरे, 41 कुटुंबे, 152 लोकसंख्या असणारा सर्व परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर दोन्ही कंटेनमेंट झोनमध्ये 15 जुलै रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी पी. एस. ढगे यांनी दिले आहेत.
बुरंबावडे गावठाणवाडी येथे कंटेनमेंट झोन
देवगड तालुक्मयातील बुरंबावडेमधील गावठाणवाडी येथील मंगेश बाबजी मांजरेकर यांची तीन घरे, चार कुटुंबे असणारा सर्व परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेनमेंट झोनमध्येही 15 जुलै रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे, असे आदेश पी. एस. ढगे यांनी दिले आहेत.
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 4021
अहवाल प्राप्त झालेले नमुने 3944
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 229
निगेटिव्ह आलेले नमुने 3715
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 77
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 69
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 154
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 105
शुक्रवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 2654
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 16407
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 29
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13930
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2448
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 121537