अचूक बातमी “तरुण भारत” ची, सोमवार, 7 जून 2021, सकाळी 11.45
● रविवारी रात्री 1,196 जण बाधित ● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 11.58 ● आता तरी आकडेवारीचा घोळ करू नका ● 10,330 जणांचे नमुने तपासले ● जिल्ह्यात 2,274 बेड शिल्लक ● प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 2,546 रुग्ण ● लॉकडॉऊन संपण्याच्या आधी शिथिलता ● मृत्यू दर रोखण्याचे आव्हान
सातारा / प्रतिनिधी :
देशात, राज्यात दुसरी लाट ओसरत असताना सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग अद्याप हजारांच्या पटीत शिल्लक आहे. बाधित वाढीने दोन हजारांचा रतीब बंद करून आता एक हजार संख्येचा रतीब सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसापासून तू सुरू असून आज देखील आलेल्या अहवालात 1,196 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे मात्र वेग मंदावला याचा दिलासा यामध्ये आहे. आकड्यांचा खेळ किती विचित्र असतो याची प्रचिती गेल्या महिन्यात जिल्हावासीयांना घेतली आहे मात्र आता लॉकडाउन डाऊन थोडा तरी शिथिल केल्याने थोडासा सुटकेचा निश्वास टाकला आहे.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 11.58
रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 10,330 जणांचे नमुने तपासण्यात आल्यानंतर 1,196 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 11.58 नमूद करण्यात आलेला आहे. यामध्ये 7,093 जणांची अँटीजन टेस्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये 663 जणांचा अहवाल बाधित असून 7.53 असा पॉझिटिव्ह दर आहे. तर 3,237 जणांची rt-pcr टेस्ट करण्यात आली असून यामध्ये 533 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे त्यामुळे rt-pcr नुसार पॉझिटिव्हिटी रेट 16.47 एवढा आहे.
लॉकडॉऊन संपण्याच्या दोन दिवस आधी शिथिलता
जिल्ह्यातील स्थिती प्रचंड भयंकर झाल्याचे पाहून जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी पुन्हा आठ दिवसांचा कडक लॉकडाउन जिल्ह्यावर लादला होता दिला होता, अशी नागरिकांची भावना आहे. तो लॉकडाऊन दि. 8 जूनपर्यंत होता. मात्र राज्य शासनाच्या निकषानुसार सातारा जिल्हा चौथ्या टप्प्यात असून त्यानुसार सिंह यांनी रविवारीच म्हणजे लॉकडाऊन संपायला दोन दिवस बाकी असतानाच शिथीलता दिल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जगरहाटी काही प्रमाणात सुरू होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
जिल्ह्यात 2,274 बेड शिल्लक
जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये रविवारच्या अहवालानुसार प्रत्यक्ष दवाखान्यात 2,546 एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्व डीसीएच, डीसीएचसी हॉस्पिटलमध्ये एकूण 4,820 बेड उपलब्ध आहेत. आजमितीस त्यातील 2,274 एवढे बेड रिक्त आहेत. ही स्थिती दिलासादायक असून सध्या बेडसाठी नागरिकांची होणारी पळापळ थोडी थांबली आहे.
आता तरी आकडेवारीचा घोळ करू नका
गेल्या मार्च पासून सुरू झालेली कोरोना विरुद्धची लढाई ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये भयंकर ठरली होती. त्यानंतर थोडासा दिलासा मिळाला असताना पुन्हा कडक उन्हाळ्यात देखील कोरोना वळवळू लागला. तो गतवर्षीपेक्षा भयंकर ठरला. या काळात लोकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याची गरज असताना सातारात आकडेवारीचा खेळ सुरू होता. त्यामुळे जिल्ह्याला लॉकडाऊन करावा लागला. या लॉकडाउनच्या जोखडात अडकलेले जिल्हावासिय निमूटपणे नियम पाळून सहकार्य करत होते. गेल्या वर्षभरात जिल्हावासियांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र त्याच नागरिकांना पेंडिंग आकडेवारीच्या खेळात गुंतवून कडक लॉकडाऊन मध्ये ढकलले होते. तो आकडेवारीचा खेळ बंद करा. कामात पारदर्शकता आणा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 8,54,809, एकूण बाधित 1,74,590, घरी सोडण्यात आलेले 1,55,258, मृत्यू 3,864, उपचारार्थ रुग्ण 15,467
रविवारी जिल्हय़ात बाधित 1,188, मुक्त 1,110, बळी 36