ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉक डाऊन 5 संदर्भात केंद्र सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली. 1 जून ते 30 जून दरम्यान हा लॉक डाऊन असणार आहे. लॉक डाऊन हा फक्त कंटेनमेंट झोनमध्ये मर्यादित असणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरू केले जातील.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉक डाऊन 5 संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. हा लॉक डाऊन कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित असून टप्प्या टप्याने अन्य क्षेत्रात सूट दिली जाणार आहे. सध्याचा रात्रीचा कर्फ्यू सुरूच राहणार असून, अत्यावश्यक वस्तूसाठी कोणताही कर्फ्यू असणार नाही. रात्री 9 ते सकाळी पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.
महत्वाचे म्हणजे, कंटेनमेंट झोन वगळता, अन्य भागात आठ जून नंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्प्याने सुरू केले जाणार आहेत. तसेच मेट्रो, रेल्वे, इंटरनॅशनल एअर सर्विसेस, शाळा, कॉलेज, शैक्षणिक वर्ष याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला जाईल.
दरम्यान, राज्य सरकारला जास्तीत जास्त निर्णय घेण्याचे अधिकार दिले असून, हा लॉक डाऊन कुठे आणि कसा पाळायचा याबाबतचे निर्णय राज्य सरकार घेईल.