पेंटागॉनची धुरा सांभाळणारे पहिले बिगरश्वेतवर्णीय ठरणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी माजी जनरल लॉयड ऑस्टिन यांना नवे संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. पेंटागॉनची जबाबदारी सांभाळणारे लॉयड हे अमेरिकेचे पहिले बिगरश्वेतवर्णीय जनरल असतील. बायडेन आता ऑस्टिन यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेससमोर मांडणार आहेत. काँग्रेसच्या मंजुरीनंतर ऑस्टिन पद सांभाळतील. ऑस्टिन यांनी इराक युद्धात अमेरिकेच्या सैन्याचे नेतृत्व केले आहे. याचबरोबर त्यांना सीरिया, अफगाणिस्तान आणि येमेनमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.
67 वर्षीय ऑस्टिन यांना अमेरिकेच्या सर्वोत्तम जनरल्सपैकी एक मानले जाते. तसेच ते चीफ ऑफ स्टाफही राहिले आहेत. याचबरोबर युनायटेड स्टेट्स कमांडचेही त्यांनी नेतृत्व केले आहे. ऑस्टिन 4 वर्षांपूर्वीच निवृत्त झालेले असल्याने त्यांच्या नियुक्तीला काँग्रेसची मंजुरी आवश्यक आहे. संघीय कायद्यांनुसार निवृत्त झाल्याच्या 7 वर्षांनीच एखाद्या जनरलला ही भूमिका सोपविली जाऊ शकते.
अनेक दिवसांपासून या पदाच्या शर्यतीत 3 नावे चर्चेत होती. मायकल फ्लोरिनी आणि जेह जॉन्सनही या शर्यतीत होते. मायकल हे बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उपसंरक्षणमंत्री राहिले आहेत. तर जॉन्सन हे होमलँड सिक्युरिटीचे माजी प्रमुख होते.
महत्त्वाची जबाबदारी
ट्रम्प प्रशासनादरम्यान अमेरिका आणि चीन यांच्यात अनेक मुद्दय़ांवरून गंभीर तणाव राहिला आहे. तैवान आणि दक्षिण चीन समुद्रात दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामनेही आले होते. अमेरिकेच्या युद्धनौका अद्याप या भागात तैनात आहेत. अमेरिकेची लढाऊ विमाने आपल्या क्षेत्रातून उड्डाणे करत असल्याचा आरोप चीनने केला होता. कोरोनाच्या काळात अमेरिकेची जनता चीनला स्वतःचा सर्वात मोठा शत्रू मानत आहे. याचमुळे चीनविरोधात कठोर भूमिका घेण्याचा दावा बायडेन यांच्यावर आहे.