प्रकरणाची चौकशी करा, अन्यथा जिल्हा अरण्य अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनचा इशारा
प्रतिनिधी /खानापूर
लोंढा विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफीसर प्रशांत गौराणी यांनी आपल्या कपाळाला पिस्तूल लावून आवाज कराल तर जीवे मारु, अशी धमकी दिल्याची माहिती जि. पं. माजी सदस्य बाबुराव देसाई यांनी दिली आहे. माझ्यासारख्या सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱया एका जि. पं. माजी सदस्याला या रेंज फॉरेस्ट ऑफीसरकडून थेट पिस्तूल लावून धमकावले जाते. मग सामान्य लोकांना हा अधिकारी काय वागणूक देत असेल, असा सवाल करत त्यांनी वनखात्याच्या वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मला न्याय द्यावा, अन्यथा मी बेळगाव येथील जिल्हा अरण्य अधिकाऱयांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा इशारा त्यांनी दिला असून यासंदर्भात सोमवारी सकाळी 10 वाजता खानापूर येथे प्रमुख भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची बैठक बोलाविली आहे. आणि त्या बैठकीतून पुढील निर्णय घेऊ, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
अधिक महिती देताना बाबुराव देसाई म्हणाले, लोंढा परिसरातील विकासकामाला रेंज फॉरेस्ट ऑफीसर प्रशांत गौराणी नेहमी अडथळे करीत आहेत. त्यामुळे घोसे मार्गावरील पुलाचे काम रखडले आहे. तसेच वनखात्याच्या हद्दीत विद्युतखांब बसविण्यास रेंज फॉरेस्ट ऑफीसरने विरोध केल्याने माचाळी गावात गेल्या आठ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासंदर्भात मी शनिवारी त्यांना फोनद्वारे तुम्ही विकासकामात अडथळे करू नका, यापूर्वी जितके रेंज फॉरेस्ट ऑफीसर लोंढय़ाला आले त्या सर्वांनी विकासकामाला सहकार्य केले. त्याप्रमाणे तुम्ही देखील सहकार्य करा, अशी केवळ विनंती केली. त्यावेळी प्रशांत यांनी आपण नंतर बोलतो म्हणून फोन ठेवले. यानंतर पुन्हा मी दोन-तीनवेळा फोन करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रशांत यांनी तुम्हाला कधी फोन करायचा समजते की नाही, असे म्हणत अरेरावीची भाषा वापरली. मी देखील ‘तुम्ही अरेरावाची भाषा बोलू नका, जरा भान ठेवून बोला’, असे म्हटले. त्यावेळी त्यांनी रागाने पुन्हा फोन ठेवला. यानंतर रविवारी सकाळी आठ-दहा गार्डना माझ्या घरी पाठवले. त्यावेळी मी गार्डना विचारले तुम्ही का आलात, नाही तुम्हाला साहेबानी बोलाविले आहे. त्यांचा निरोप घेऊन आलो आहोत, असे सांगितले. त्यावर मी काय वाळू चोर, किंवा लुटारु आहे काय, एवढे लोक पाठवायची गरज काय होती, असा त्यांना सवाल केला. यामुळे फोनद्वारेच त्या गार्डनी रेंजरला माझा निरोप दिला. त्यावर रेंजर प्रशांत यांनी पुन्हा मला फोन करून तु सरळ येणार की नाही, मी आलो तर घरातून ओढून काढून मारत ऑफीसकडे आणीन, असे म्हणून धमकावले. त्यानंतर मी एकटाच रेंज फॉरेस्ट ऑफीसकडे गेलो. त्यावेळी गौराणी यांनी माझ्यासमोर दहा-बारा गार्डना उभा केले. व सरळ हातातील पिस्तूल घेऊन माझ्या कपाळाला लावली. व आवाज करशील तर काय करीन… असे धमकावले. त्यावेळी मी देखील जरुर माझ्या कपाळावर पिस्तूल चालवा, असे त्यांना सांगितले. त्यांनतर आमच्यात शाब्दिक चकमक झाली. व मी रागारागाने घरी परतलो. एकूणच रेंज फॉरेस्ट ऑफीसर प्रशांत गौराणी यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याने याची वरिष्ठांनी तातडीने दखल घ्यावी, अन्यथा मला नाईलाजाने जिल्हा अरण्य अधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशाराही दिला.