किरण ठाकुर यांचे प्रतिपादन, कणकुंबीत लोककल्पच्या विक्री केंद्राचे थाटात उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
कणकुंबी परिसरात प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढावे आणि गावातच उद्योग उपलब्ध व्हावा, यादृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहेत. तसेच हा परिसर अलिकडे पर्यटनस्थळ म्हणून देखील पुढे येत आहे. त्यामुळे लोककल्प फौंडेशनने सुरू केलेल्या विक्री केंद्राला प्रतिसाद वाढेल, असा विश्वास लोकमान्य सोसायटीचे संस्थापक, चेअरमन किरण ठाकुर यांनी व्यक्त केला.
लोकमान्य सोसायटी पुरस्कृत लोककल्प फौंडेशनच्या विक्री केंद्राचे मंगळवारी कणकुंबी (ता. खानापूर) येथील बसस्थानकाजवळ थाटात उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी लोककल्पचे संचालक नितीन धोंड, अजित गरगट्टी, किरण गावडे, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, माजी ता. पं. सदस्या पुष्पा नाईक, ग्रा. पं. अध्यक्ष रमेश खोरवी आदी उपस्थित होते.
किरण ठाकुर म्हणाले, कणकुंबी परिसरातील लोकांना उद्योग मिळावा यासाठी या नव्या प्रकल्पाची नवनिर्मिती केली आहे. या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळेल. बेळगाव-गोवा मार्गावरील निसर्गरम्य कणकुंबी गावात विक्री केंद्र सुरू होत असल्याने उद्योगासाठी याचा लाभ घेता येणार आहे. या परिसरातील नैसर्गिक संपदा, नदी, नाले आणि घनदाट वन्यप्रदेशामुळे हा भाग पर्यटनस्थळ म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे येत्या काळात याठिकाणी अनेक उपक्रम राबवून उद्योग वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
या विक्री केंद्रात चिनी मातीचे कंदील, मूर्ती व इतर आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यापुढे ग्रामस्थांनी तयार केलेल्या वस्तू देखील विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना या विक्री केंद्राचा लाभ होणार आहे. प्रारंभी अनंत गावडे यांच्या हस्ते पूजन झाले. संचालक किरण गावडे यांनी कणकुंबी परिसरातील आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जनतेला उद्योग मिळावा, या हेतूने या केंद्राची निर्मिती केल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई म्हणाले, या विक्री केंद्रामुळे गावातील महिलांना गावातच उद्योग प्राप्त होणार आहे. गावातच उद्योग मिळणार असल्याने बाहेर जायची धडपड देखील थांबणार आहे. त्यामुळे येत्या काळात या विक्री केंद्राची भरभराट होईल, अशी इच्छा व्यक्त केली.
याप्रसंगी लोकमान्यच्या सीएसआर मॅनेजर मालिनी बाली, धनश्री कदम, शेखर पाटील यांच्यासह राजाराम गावडे, अरुण नाईक, संजय पाटील (चिखले), डॉ. पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते.