नगरविकास मंत्र्यांनी टोचले मनपा आयुक्तांचे कान
प्रतिनिधी / सांगली
लोकप्रतिनिधी व प्रशासन ही महापालिकेच्या विकासाची दिन चाके आहेत. ती विरोधी दिशेला धावली की अपघात होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करा. अवास्तव व चुकीचा खर्च होणार नाही याची काळजी घ्या, अशा परखड शब्दात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचे कान टोचले. दरम्यान महापालिकेच्या विकास योजनांसाठी आवश्यक निधी देऊ. पण महापालिकेनेही स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत असे आवाहनही मंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात मंत्री शिंदे यांनी महापालिका विकास कामे, अपूर्ण योजना, कामांचा सखोल आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री जयंतराव पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर, महापौर गीता सुतार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, राज्य शासनाने गुंठेवारी तसेच विकास नियंत्रण नियमावली बाबत चांगला निर्णय घेतला आहे. दोन्ही निर्णय जनतेच्या हिताचे आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी महापालिकेने करावी. लोकांना या निर्णयाचा फायदा झाला पाहिजे यासाठी शिबीर आयोजित करून जनजागृती करावी.