नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशातील कोरोना स्थितीवरून विरोधकांकडून वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जातो. सोशल मीडियावर देखील लसीकरणासह अन्य काही कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेटकरी निशाणा साधत असतात. अशा स्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याची नवीन माहिती समोर आली आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने ( Morning Consult) केलेल्या सर्व्हेक्षणात मोदींचं गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व्हेक्षणात २१२६ भारतीयांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं अशी माहिती दिली आहे. यानुसार ६६ टक्के भारतीयांना मोदींची बाजू घेतली असून २८ टक्के लोकांना मोदींविरोधात मत नोंदवण्यात आलं आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ६६ टक्क्यांसोबत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी ६५ टक्क्यांसोबत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीचा क्रमांक आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ५३ टक्क्यांसोबत सहाव्या क्रमांकावर आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या गुणांकनात घट झालेली असली तरी इतर जागतिक नेत्यांना त्यांनी मागे टाकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. जून महिन्यात मोदींचं गुणांकन ६३ टक्के इतकं होतं. मात्र यावेळीही त्यांनी इतर नेत्यांना मागे टाकलं असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. विविध देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अॅप्रूवल रेटिंग’ची ही ताजी आकडेवारी समोर आली आहे.