अमेरिका, ब्रिटनच्या अध्यक्षांनाही टाकले मागे, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्रमवारीत दुसऱया स्थानी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर असल्याची माहिती शुक्रवारी समोर आली. अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील नेत्यांच्या ग्लोबल अप्रूव्हल रेटिंगवर नुकतेच सर्वेक्षण करून नेत्यांची लोकप्रियता जाहीर केली. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 71 टक्के गुणांकन मिळवत जागतिक पातळीवरील बऱयाच नेत्यांना पिछाडीवर टाकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त भारतातच नाही, तर जगभरात लोकप्रिय झाले आहेत. त्यांचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. मोदींची लोकप्रियता भारतासोबतच जगात मोठय़ा प्रमाणात पसरल्याचेच दिसून येत आहे. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या यादीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेटिंग 71 टक्के आहे. मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. इतकेच नाही तर लोकप्रियतेच्या आकडेवारीत पंतप्रधान मोदींच्या आसपासही कोणता नेता नाही. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये दुसऱया क्रमांकावर मेक्सिकोचे अध्यक्ष आंदेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे असून त्यांचे रेटिंग 66 टक्के आहे. तिसऱया क्रमांकावर असलेले इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचे रेटिंग 60 टक्के आहे. त्यानंतर या यादीत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (48 टक्के) आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झो (44 टक्के) आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष सहाव्या स्थानी
ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सहाव्या क्रमांकावर आहेत. जो बायडेन यांचे रेटिंग 43 टक्के आहे. त्यांच्यापाठोपाठ कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे रेटिंग 43 टक्के, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन 41 टक्के आहे. त्यानंतर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ (40 टक्के), दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन (38 टक्के), ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो (37 टक्के) यांचा क्रमांक लागतो, त्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (34 टक्के) आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (26 टक्के) यांचा क्रमांक लागतो.
अमेरिकेची ‘मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स’ ही फर्म सध्या अमेरिकेव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि ब्रिटनमधील नेत्यांच्या रेटिंगचे निरीक्षण करत आहे.
‘टॉप टेन’…
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी – 71 टक्के
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर – 66 टक्के
इटलीचे पंतप्रधान मारिया द्राघी – 60 टक्के
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा – 48 टक्के
जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झो – 44 टक्के
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन – 43 टक्के
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो – 43 टक्के
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन – 41 टक्के
स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ – 40 टक्के
कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन – 40 टक्के