प्रतिनिधी / पंढरपूर
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी यांच्या सहकार्यातून पुणे येथील सुमारे 6 विद्यार्थी सायकल वारी करीत शनिवारी पंढरपूरात विसावले. कोरोना आणि सामाजिक जागृतीचे कार्य करीत हे विद्यार्थी संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून पंढरपूरात आले आहेत. पंढरीत आल्यावर या सायकल वारक-यांनी थेट नामदेव पायरीचे आणि चंद्रभागेचे मुखदर्शन करीत पंढरीच्या वारीची धन्यता मानली.
पुणे ही सांस्कृतीक आणि शैक्षणिक नगरी म्हणून ओळखली जाते. याच नगरीमध्ये राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी राहतात. यातील शिक्षणासाठी वास्तव्यास असणा-या ओंकार घोलप, ऋषिकेश कुंभार, शंतनु सराळ, अथर्व कदम, प्रथमेश शुक्ला आणि आकाश देशमुख हे सहा विद्यार्थी हौशी सायकलस्वार आहेत. या सायकलस्वारांनी आजपर्यत कोकण, मुंबई तसेच अनेक गडकोट अशा ठिकाणी सायकलवरुन जाऊन भ्रमंती केली आहे. हीच बाब लक्षात घेऊन लोकामन्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी पुणे यांच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने या सहा विद्यार्थ्यांना सायकल वारी करण्यासाठी पुण्याहून पंढरपूरसाठी शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी चार वाजता प्रस्थान ठेवले.
पुणे येथून पुणे विभागाचे क्षेत्रीय अधिकारी सुशिल जाधव यांनी या सायकलवीरांना हिंरवा झेंडा दाखवून पंढरपूरकडे पाठवले. यानंतर हे सायकल स्वार पुणे, हडपसर, यवत, इंदापूरमार्गे पंढरपूरात शनिवारी दुपारी १ वाजता येऊन विसावले. या सायकलस्वारांचा संपूर्ण मार्ग हा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. या सायकल स्वारांचा पंढरपूरात लोकामन्यच्या पंढरपूर शाखेच्या वतीने सागर राहीरकर, अश्विनी कुलकर्णी, वैभव सांळुखे यांनी स्वागत केले. विशेष म्हणजे पंढरपूरात आल्यावर या सायकलस्वारांनी नामदेव पायरी येथून विठोबाचे दर्शन घेतले. चंद्रभागेचे वाळवंट पाहीले आणि त्यानंतर तात्काळ परतीचा प्रवास पत्करला.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी कायमच लोकहिताच्या दृष्टीने सहकार्य करीत असते. लोकामान्यचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून अनेक स्तरांवर विविध उपक्रम राबवले जातात. यांचाच एक भाग म्हणून सायकल वारी करीत असताना कोरोना तथा संसर्गीय आजाराविषयीचे फ्ढलक लावून या विद्यार्थ्यानी आपली संपूर्ण सायकलवारी पूर्ण केली आहे.