वार्ताहर / सांबरा
शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या जवळच जर एखाद्या गोष्टीची सोय केली तर नागरिक त्याचा निश्चितच लाभ घेतात. हा उद्देश लोकमान्य सोसायटीने अवलंबविला आणि दुचाकी पीयुसी चेकअप व मोफत नेत्रचिकित्सा अशा दोन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याला या परिसरातील जनतेने भरभरून साथ दिली. वाहन तपासणी व नेत्रचिकित्सा शिबिरात जवळपास पाचशे जणांनी सहभाग दर्शविल्याचे मनोगत सांबरा लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे सांबरा शाखा व्यवस्थापक अजित सरंजामे यांनी व्यक्त केले.
सांबरा या परिसरातील गावांमधील नागरिकांसाठी पीयुसी वाहन तपासणी तसेच मोफत नेत्रचिकित्सा अशा दोन भागांचे शिबिर एकाच छताखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या शुभारंभप्रसंगी शाखा व्यवस्थापक अजित सरंजामे बोलत होते.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना बाहेर पडणे तसेच दवाखान्यांना जाणे मुष्किल झाले होते. अशा परिस्थितीत सांबरा या ठिकाणी मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केल्याने याचा लाभ आम्हा नागरिकांना चांगलाच झाला असल्याचे नागरिकांतून बोलले जात होते. तसेच वाहन तपासणीसाठी बेळगाव गाठावे लागते. ते याच परिसरात सोय झाल्याने आम्हा वाहनधारकांची सोय झाल्याचे वाहनधारकांनी सांगितले.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रदीप रेडेकर, श्रीधर नावगेकर, भरमा चिंडाळी, महेश गावडे, प्रशांत होनगेकर, गुरु तंगणकर, आकाश हणमशेट, भरतेश कासोलकर, चिदंबर कुलकर्णी, आदिनाथ, रिजनल मॅनेजर बेळगाव मधुकर कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अवधुत चौगुले, पुजा भोगण, ओंकार चौगुले यांनी नेत्रचिकित्सा केली.