प्रतिनिधी/ बेळगाव
देशाबरोबरच राज्यावर आलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी बेळगावमधील सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने मोठे पाऊल उचलले आहे. तातडीने पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे तब्बल 11 लाखांचा धनादेश दिला आहे. राज्याला पहिली मोठी मदत लोकमान्य सोसायटीने केली आहे. मुख्यमंत्री रिलीफ फंडाच्या नावे ही रक्कम देण्यात आली.
कोरोना विषाणूमुळे तब्बल 21 दिवस लॉकडाऊन केल्यामुळे राज्यातील व देशातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे सरकारही अडचणीत आले आहे. त्यासाठी प्रत्येकाने मदत करणे गरजेचे आहे. लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन किरण ठाकुर यांनी नेहमी सामाजिक कार्यासाठी हातभार लावला आहे. आता ओढवलेल्या या संकटाला मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे समजूनच किरण ठाकुर यांनी सरकारला हा मदत निधी दिला आहे.
पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे लोकमान्यचे संचालक पंढरी परब, अनिल चौधरी व गजानन धामणेकर यांनी धनादेश दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.