प्रतिनिधी /बेळगाव
चिंतनशील साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दि. 16 रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य ग्रंथालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्याचे साहित्यिक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी ‘जी-एं’ च्या साहित्याबद्दल बोलणार आहेत. त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे…
प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून 3 दशके गोव्यात ज्ञानदान केले आहे. त्यांचा ‘आस्वादाच्या पाऊलवाटा’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. गोवा सरकार पुरस्कृत ‘गोमंतकीय मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या ग्रंथात, त्याचप्रमाणे ‘कवी बा. भ. बोरकर काव्यसमीक्षा’ या ग्रंथासाठी लेखन केले आहे. डोंबिवली येथील 90 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून सहभाग घेतला. ‘गोमंतकाची अस्मिता’ या मुखपत्राचे 12 वर्षे संपादन केले.
अकरावी व बारावीच्या मराठी पाठय़पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. प्रा. कुलकर्णी विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदनही करतात. मराठी साहित्य, संत वाङ्मय आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास हे त्यांचे जिव्हाळय़ाचे विषय असून या विषयांवर त्यांची व्याख्याने अनेक ठिकाणी झाली आहेत. तरुण भारतच्या ‘अक्षरयात्रा’ या रविवार पुरवणीसाठी ते नियमितपणे लेखन करतात.