प्रतिनिधी/ पणजी
सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनेकविध संकल्पना राबविणारी सहकारातील अग्रगण्य संस्था म्हणून जनमानसामध्ये लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे नाव मोठय़ा आदराने घेतले जाते.
रक्तदान शिबिर, शिक्षकांचे-गुरुजनांचे सत्कार यासारख्या संकल्पनाही लोकमान्यने यशस्वीपणे राबविल्या. त्याला गोव्यातून उत्तम प्रतिसाद लाभला. कोविडमुळे गेली दोन वर्षे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शालेय विद्यार्थ्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन गणेशचतुर्थीनिमित्त गणरंग चित्रकला स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशी स्पर्धा घेण्यात आली. त्याला बाराशे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
सहा ते दहा वर्षांच्या मुलांसाठी ‘गणेशचतुर्थी’ व ‘सामाजिक जागृती’ हे विषय देण्यात आले होते. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ आणि ‘फ्युचर सिटी’ हे दोन विषय 11 ते 13 वर्षे वयोगटाच्या मुलांसाठी होते.
उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील विजेते पुढीलप्रमाणे –
11 ते 13 वयोगट – उत्तर गोवा – अनिश नीलेश नाईक, मेरशी, बेनॉन डी अल्मेदिया, तालिगांव, दिया अनिल साळगांवकर, हरमल.
6 ते 10 वयोगट – उत्तर गोवा – धन्वी विवेक दिवकर, करासवाडा, स्वरा संगम शिंदे, डिचोली, शिवांक रमेश च्यारी, पणजी.
11 ते 13 वयोगट – दक्षिण गोवा – श्रेया सज्जन काकोडकर, वेळीप, झेनोलिया नोरोन्हा, केपे, परम देसाई, काणकोण.
6 ते 10 वयोगट – दक्षिण गोवा – हर्षल विवेक पाठारे, घोगळ, संजीवनी ठाकूर, वेळीप, सानिया गुप्ता, दाबोळी.
उत्तर गोव्यातील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्तर गोव्याचे रिजनल मॅनेजर कुमार प्रियोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. असिस्टंट रिजनल मॅनेजर अँथनी आझावेदो यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून लोकमान्य सोसायटीच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. डॉ. काळे यांनी गोमंतकीयांचे चित्रकलेतील योगदान लक्षणीय असून ती परंपरा पुढे चालविणारे चित्रकार निर्माण व्हावेत त्यासाठी विजेत्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. त्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. पालकांतर्फे श्री. आल्मेदा यांनी मनोगत व्यक्त करताना गेली दोन वर्षे घरातच अडकून पडलेल्या आमच्या पालकांना पहिल्यांदाच उपक्रमात सहभागी होण्यासाठी संधी लोकमान्य सोसायटीने उपलब्ध करून दिल्याबद्दल सोसायटीच्या कार्याविषयी कौतुकोद्गार काढले. अक्षय सिनारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गणरंग स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. गोविंद काळे व चित्रकार पांडुरंग नाईक यांनी काम पाहिले.