उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे गौरवोद्गार : स्नेहमेळाव्याला शुभचिंतकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : अनेक मान्यवरांकडून झाले अभिनंदन, प्रशंसा
प्रतिनिधी / म्हापसा
लोकमान्य सोसायटी व तरुण भारत गोव्यातील नामवंत संस्था आहेत. राज्यात अनेक सोसायटय़ा आल्या व रसातळालाही पोचल्या. मात्र लोकमान्य सोसायटीने राज्यात गरूडझेप घेतली असून लोकांमध्ये ही सोसायटी विश्वासास पात्र ठरली आहे. या सोसायटीमधून गोव्याला भवितव्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी काल बुधवारी म्हापसा येथे बोलताना केले.
म्हापसा येथे लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिडेटच्या म्हापसा येथे नव्याने उभारलेल्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी हे गौरवोद्गार काढले.
‘लोकमान्य’ने गोमंतकीयांना रोजगार दिला
ते पुढे म्हणाले की या सोसायटीमध्ये जो कामगारवर्ग आहे तो शंभर टक्के गोमंतकीय आहे. ही एकमेव अशी सोसायटी आहे ज्यांनी गोमंतकीयांना रोजगाराच्या बाबतीत स्थान दिलेले आहे. गोमंतकीयांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे या उद्देशाने लोकमान्यने गोमंतकीय जनतेला सदैव पाठिंबा दिलेला आहे. अशा सोसायटीने यापुढेही जाऊन राज्य पुढे आणण्यासाठी मदत करावी, असेही ते म्हणाले.
स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिडेटच्या म्हापसा येथील बोशान क्लासिक येथे नव्याने उभारण्यात आलेल्या विभागीय कार्यालयात ग्राहकांचा स्नेहमेळावा बुधवारी मोठय़ा थाटात संपन्न झाला. दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यास मंत्री, आमदार, भागधारक, नगरसेवक, खातेदारक आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. संचालिका सई ठाकूर बिजलानी, प्रितम बिजलानी, उत्तर गोवा व्यवस्थापक कुमार प्रियोळकर, सहाय्यक व्यवस्थापक ऍन्थनी आझावेदो, ‘तरुण भारत’चे गोवा संपादक सागर जावडेकर, गायत्री दुभाषी नाईक यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर, कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो, माजी आमदार किरण कांदोळकर, शिवोलीचे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर, म्हापशाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो, नगरसेवक संजय मिशाळ, नगरसेवक संदीप फळारी, नगरसेवक सुधीर कांदोळकर, उद्योजक तारक आरोलकर, प्रख्यात गायक प्रसाद सावकार, गौरी कामत, महाबळेश्वर च्यारी, प्रवीण आर्लेकर, राजन घाटे, गोविंद पर्वतकर, सतीश बिचोलकर, ओशेलचे माजी सरपंच रामा परब आदींनी यावेळी येऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
मायकल लोबो, तानावडेंकडून प्रशंसा
कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी लोकमान्य सोसायटीला शुभेच्छा देताना सांगितले की, राज्यात लोकमान्यने गरूडभरारी मारली असून त्यांनी राज्यात आज एक वेगळा ठसा उमटलेला आहे. सामान्य नागरिकांना एक रोजगाराचे व्यासपीठ देऊन तसेच खातेधारकांना छोटे, मोठे कर्ज देऊन उद्योग करण्यास संधीही दिली आहे. अशी आर्थिक मदत यापुढेही करून आपले नावलौकिक लोकमान्यने असेच पुढे न्यावे असे ते म्हणाले.
लोकमान्यची यापुढेही भरभराट होवो : विनोद पालयेकर
लोकमान्यचे नाव सर्वांच्या ओठांवर असून ही एक चांगली पतसंस्था ठरली आहे. उत्तर गोव्यात त्यांच्यामुळे चांगले कार्य चालते. याच्यापुढेही जाऊन या संस्थेची कायमस्वरुपी भरभराट होवो असे शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर म्हणाले.
लोकामान्य सोसायटी अभिनंदनास पात्र : कांदोळकर
लोकमान्य सोसायटीने आपला राज्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे. करासवाडा येथील शाखेचे उद्घाटनही आपल्या हातून झालेले आहे. या सोसायटीची सेवा राज्यभर जनतेला मिळते. त्यामुळे ही सोसायटी अभिनंदनास पात्र आहे, असे माजी आमदार किरण कांदोळकर म्हणाले. आपणही या सोसायटीकडे व्यवहार केलेला आहे असेही कांदोळकर यांनी बोलून दाखविले.
महाराष्ट्रासह गोव्यातही मिळविली लोकप्रियता : साळगावकर
आमदार जयेश साळगावकर म्हणाले की, लोकमान्य सोसायटी महाराष्ट्राबरोबर गोव्यातही आपले नाव करीत आहे. विविध सोसायटी को. ऑपरेटीव्ह सेक्टरमध्ये दिसायला पाहिजे ते आम्हाला पहायला मिळत नाही. मात्र लोकमान्यने आपले नाव उज्ज्वल ठेवले आहे. विविध गावामध्ये लोकमान्यच्या शाखा आम्हाला पहायला मिळत आहेत. गंभीरता आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्याकडे या सोसायटीने सदैव भर दिला आहे. त्यामुळे लोकमान्य अभिनंदनास पात्र आहे. असे साळगावकर म्हणाले.
म्हापशाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो, शिवोलीचे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनीही लोकमान्य सोसायटीला आपल्या शुभेच्छा देताना ही पतसंस्था अनेक गोरगरिबांना कर्ज देऊन नावलौकिकास आली आहे. या पतसंस्थेने यापुढे अशीच भरीव कामगिरी करून सामान्य जनतेला आधार द्यावा, असे ते म्हणाले.