ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक निर्बंध शिथील झाले आहेत. मात्र, मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी असून संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा मिळावी आणि लोकल प्रवासाला परवानगी न देण्याच्या विरोधात मुंबई भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई व ठाण्यात भाजपचे नेते, आमदार व कार्यकते रस्त्यावर उतरले. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेट रेल्वे स्थानकात तर, आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना प्रवास करू द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. याबाबत अधिक माहिती देताना प्रवीण दरेकर यांनी लसीकरण केल्यानंतर विमान, एसटी, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी यातून प्रवासास परवानगी आहे, मग लोकलमध्ये का नाही, असा प्रश्न उपस्थित करत लोकल मुभा मिळेपर्यंत सविनय कायदेभंग सुरूच ठेवणार, असा इशारा देखील दिला आहे.
तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकात देखील भाजपने आंदोलन करीत लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी केली आहे. यावेळी ठाणे भाजप अध्यक्ष व आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लोकल सुरू करा, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकाचा परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचे दिसत आहे. शिवाय, भाजपच्या काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतले गेले आहे. चर्चगेट, दहिसर घाटकोपर या ठिकाणी आंदोलनास सुरूवात झाली आहे.