जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
प्रतिनिधी / ओरोस:
लोकशाहीचे भवितव्य तरुण पिढीच्या हाती आहे. त्यामुळे मतदानाच्या नागरी कर्तव्याचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ओरोस येथील राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात बोलताना केले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम झाला.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत आदी उपस्थित होते.
निवडणूक हा राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव मतदानाने साजरा करायचा असतो. आजच्या आपल्या लोकशाहीचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात आहे. त्यामुळे तरुणांनी मतदानामध्ये सक्रीय भाग घ्यावा, असे आवाहन के. मंजुलक्ष्मी यांनी केले. मतदान जागृतीपर कार्यक्रमांतर्गत जिल्हय़ात लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला अशा विविध स्पर्धांसह, प्रभात फेरी, दशावतार अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यात आली होती. आजही या ठिकणी मुलांनी सुंदर शब्दामध्ये आजच्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आपणास सांगितले. देशातील प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी राष्ट्रीय मतदार दिवस का साजरा केला जातो, याविषयी माहिती दिली. तसेच निवडणूक प्रक्रिया व मतदानाचे महत्व सांगितले.
यावेळी ‘आम्ही कणकवलीकर’ या संस्थेने मतदान जागृतीसाठी केलेल्या कामाची पावती म्हणून संस्थेच्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. या संस्थेचे सदस्य व ज्ये÷ पत्रकार अशोक करंबळेकर यांनी तो स्वीकारला. तर शिवराज मराठा विद्यालय, साळगावची विद्यार्थिनी गायत्री प्रमोद खानोलकर, पाटकर हायस्कूल वेंगुर्ल्याची मनिषा धोंडू शिदे, कणकवली कॉलेजचा सुनिल गणेश बाकरे व आरपीडी हायस्कूल सावंतवाडीची विद्यार्थिनी तन्वी गणेश परब यांनी मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर भाषणे सादर केली. या सर्व विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेतील त्यांच्या यशाबद्दल प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा या विविध स्पर्धांमधील सहभागींनाही गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन कुडाळाचे सहाय्यक तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, शिक्षक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.