हाँगकाँगमधील प्रसारमाध्यमांना चीनचा इशारा
वृत्तसंस्था/ हाँगकाँग
हाँगकाँगच्या लोकशाहीचे समर्थन करणारे वृत्तपत्र अखेर बंद पडण्याच्या वाटेवर आहे. हाँगकाँगमधील बहुचर्चित ऍपल डेली वृत्तपत्र शनिवारपर्यंत बंद होणार आहे. या वृत्तपत्राचे 5 संपादक आणि कार्यकारी अधिकाऱयाला पोलिसांनी अटक केली आहे. याचबरोबर वृत्तपत्राशी संबंधित सुमारे 2.3 कोटी डॉलर्सची मालमत्ताही सरकारने जप्त केली आहे. हाँगकाँगमधील सद्यस्थिती पाहता या वृत्तपत्राची छपाई आणि ऑनलाईन आवृत्ती शनिवारनंतर सुरू ठेवता येणार नसल्याचे या वृत्तपत्राच्या संचालक मंडळाने म्हटले आहे.
संपादकांच्या अटकेनंतर हे वृत्तपत्र आता पडणार असल्याचे मानले जात होते. लोकशाहीचे समर्थक असलेल्या या वृत्तपत्रावर दीर्घकाळापासून चीन आणि चीनचे समर्थनप्राप्त हाँगकाँगच्या प्रशासनाची वक्रदृष्टी होती. याचदरम्यान चीन आणि हाँगकाँगच्या प्रशासनाने प्रसारमाध्यमांना कायद्याच्या कक्षेत राहण्याचा इशारा दिला आहे. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या आड बेकायदेशीर कारवाया सहन केल्या जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
या वृत्तपत्राच्या 5 संपादकांना पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप करत अटक केली आहे. वृत्तपत्रावरील कारवाईप्रकरणी अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगच्या प्रशासनावर सडकून टीका केली आहे. युरोपीय महासंघ आणि ब्रिटननेही चीनवर निशाणा साधला आहे. हाँगकाँगचे प्रशासन चीनच्या दबावाखाली लोकशाहीसमर्थकांना लक्ष्य करत असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.
1897 साली हाँगकाँगचा ताबा ब्रिटनला चीनकडून भाडेतत्वावर मिळाला होता. 1997 मध्ये ब्रिटनने कराराचा कालावधी संपल्यावर हाँगकाँगचे नियंत्रण चीनकडे सोपविले होते. तेव्हापासून स्थानिक लोक आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू आहे.