हद्दवाढीमुळे 48 नगरसेवक वाढणार
प्रतिनिधी / सातारा :
नगरपालिका निवडणूकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य शासनाच्यावतीने जे निर्णय होत आहेत. त्यानुसार सातारा शहरात हालचाली सुरु झालेल्या आहेत. गुरुवारी राजकीय ओबीसी आरक्षणाला मंजूरी मिळाली. तत्पूर्वी प्रभाग निश्चिती आणि नगरसेवक सदस्य संख्या निश्चिती ठरवण्यात येणार आहे. सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने एक वॉर्ड हा पूर्वी दीड हजार लोकसंख्याचा होता. आता तो साडेतीन हजार लोकसंख्येचा होणार आहे. तर प्रभाग हा साडेतीन हजाराचा होता. आता साडेसात हजार लोकसंख्येचा होणार आहे. नगरसेवकांसह नगराध्यक्षपदाचे कोणते आरक्षण पडणार, हे अजून ठरणार असले तरीही पन्नास टक्के महिला आरक्षण हे ठरलेले असणार आहे. एसटी प्रवर्गाचा टक्का वाढणार आहे.
सातारा शहरात गतवेळीच्या झालेल्या निवडणूका या द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाल्या. तसाच प्रकार याही वेळी होणार आहे. फक्त लोकसंख्या हद्दवाढ झाल्याने वॉर्ड आणि प्रभागामध्ये लोकसंख्या बदल होणार आहे. पूर्वी शहराची लोकसंख्या ही 1 लाख 20 हजार एवढी होती. नगरसेवकांची संख्या 40 होती. प्रभाग संख्या 20 होती. आता मात्र हद्दवाढ झाल्याने हद्दीत नव्याने 60 हजार लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे हद्दीत आलेल्या लोकसंख्येमुळे 1 लाख 80 हजार लोकसंख्या झालेली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे आता वॉर्ड हा 3 ते साडेतीन हजाराचा व प्रभाग 7 हजारांचा होणार आहे. सध्या फक्त 48 नगरसेवक असणार आहेत असे समजते. त्यातही लोकसंख्येच्या निकषानुसार एसटी या प्रवर्गातील लोकसंख्या शहरात वाढल्याची शक्यता आहे. त्यामुळे 24 प्रभागातील 48 नगरसेवकांपैकी निम्म्या नगरसेवक महिला असणार आहेत. त्यातही कोणते आरक्षण पडेल, हे आताच समजू शकत नाही.