मात्र मंजूर 66 लाख : खर्चाचा तपशील मनपाकडून बेंगळूर कार्यालयात सादर : पण चर्चा महापौर-उपमहापौर निवडणुकीची
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दोन मतदारसंघांकरिता केवळ 66 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. पण हा खर्च कोटीच्या घरात गेला असून याबाबतचा तपशील निवडणूक आयोगाच्या बेंगळूर कार्यालयात सादर करण्यात आला. तसेच उर्वरित खर्चाची रक्कम मंजूर करावी, अशी विनंती करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी येणाऱया खर्चाची रक्कम महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे पाठविली जाते. प्रत्येक निवडणुकीवेळी खर्चाची संपूर्ण रक्कम देण्यात येत होती. मात्र यावेळेच्या लोकसभा पोटनिवडणुकीवेळी खर्चाची रक्कम कपात करण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे महसुलात घट झाल्याने निवडणुकीवेळी काटकसर करावी, अशी सूचना करून रक्कम मंजूर करण्यात आली होती. बेळगाव लोकसभा मतदारसंघात उत्तर आणि दक्षिण अशा दोन मतदारसंघांचा समावेश असून या दोन मतदारसंघांतील निवडणुकीची जबाबदारी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे असते.
दोन्ही मतदारसंघात 450 हून अधिक बूथ होते. त्या मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरविणे, मतदान यंत्रे ने-आण करणाऱया कर्मचाऱयांचा पगार, निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱयांचे वेतन, आवश्यक ठिकाणी मंडप घालणे, व्हीडिओ शूटिंग, वाहनांचे भाडे, सरकारी वाहनांच्या इंधनाचा खर्च, मतदानाकरिता यंत्रोपकरणे व साहित्याची ने-आण करणे तसेच मतमोजणीवेळी नियुक्त करण्यात आलेल्या कामगारांचे वेतन, अधिकारी व कामगारांच्या जेवणाचा खर्च अशा विविध खर्चाची रक्कम निवडणूक आयोगाकडून देण्यात येते. यंदा झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीवेळी दोन मतदारसंघांच्या खर्चासाठी 66 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र 1 कोटीहून अधिक खर्च झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ही रक्कम महापालिकेने देऊ केली आहे. तसेच काही बिले अद्यापही देणे बाकी आहे. त्यामुळे या खर्चाचा तपशील महापालिकेच्या निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाकडे दिला आहे.