भाजपला रामराम ठोकून तृणमूलमध्ये केला होता प्रवेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पूर्वाश्रमीचे भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी मंगळवारी लोकसभा सदस्यत्वाचा औपचारिक स्वरुपात राजीनामा दिला आहे. सुप्रियो यांनी एक महिन्यापूर्वी भाजपमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता. स्वतःवर विश्वास दर्शविल्याबद्दल सुप्रियो यांनी पूर्वाश्रमीचा पक्ष असलेल्या भाजपचे आभार मानले आहेत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत राजीनामा दिल्यावर बाबुल सुप्रियोंनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आहेत. माझी स्वतःची राजकीय कारकीर्द भाजपमधूनच सुरू केली होती, याचमुळे हे पाऊल उचलताना अंतःकरण भरून आले आहे. मी पंतप्रधान, पक्षाध्यक्ष आणि अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. राजकारण पूर्णपणे सोडण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाचा हिस्सा नसल्याने मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अशा स्थितीत राखणे योग्य नसल्याचा विचार केल्याचे सुप्रियो म्हणाले.
पश्चिम बंगालच्या आसनसोलचे दोनवळा खासदार राहिलेले सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या दोन दिवसांनी 20 सप्टेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितली होती. ज्या पक्षाच्या तिकिटावर या मतदारसंघात विजयी झालो, त्याचा आता मी सदस्य नाही, अशा स्थितीत खासदार म्हणून राहू इच्छित नसल्याचे सुप्रियो यांनी अनेकदा म्हटले होते.