नवी दिल्ली :
लोकसभेच्या माजी अध्यक्ष आणि खासदार सुमित्राताई महाजन यांच्या निधनाच्या अफवेने गुरुवारी रात्री गोंधळ निर्माण झाला. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी ट्विट करून सुमित्रा महाजन यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाले. मात्र त्यानंतर स्थानिक नेत्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तियानी याबाबत खुलासा करत निधन झाले नसून अफवा असल्याचे स्पष्ट केले. सुमित्राताई महाजन यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. तथापि त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी गुरुवारी सायंकाळी स्पष्ट केले आहे.
गोंधळ शशी थरूर यांच्या ट्विटचा
सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याचे ट्विट शशी थरूर यांनी केले आणि गोंधळ झाला. अनेक नेत्यांनी याबाबत श्रद्धांजली पर ट्वीट केले. मात्र भाजपने या वृत्ताचा इन्कार करताच त्यांनी ते ट्विट डिलीट करून अशा अफवा पसरविणाऱ्या लोकांचा समाचार दुसऱ्या ट्विट मध्ये घेतला. दरम्यान इतर अनेक राजकीय व्यक्तींनी या ट्विट वरून श्रध्दांजलीपर ट्विट केले आहे, दरम्यान सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठीक असून त्या लवकरच रुग्णालयाबाहेर पडतील अशी माहिती मिळाली आहे. या गोंधळाबद्दल माफी मागून त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल प्रार्थनेचे संदेश आता फिरत आहेत