केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा अध्यक्षांची सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सभागृहात केंद्रीय मंत्री आणि खासदारांदरम्यान होणाऱया संभाषणाबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू असताना मंत्र्यांनी सभागृहात स्वतःचे ऑफिस चालवू नये असे बिर्ला यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री आणि एक खासदार कामकाज सुरू असतानाच संभाषण करत असल्याचे पाहून लोकसभा अध्यक्ष नाराज झाले. प्रश्नोत्तराचा तास समाप्त झाल्यावर खासदार कुठल्या तरी मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी गिरिराज सिंह यांच्या आसनासमीप पोहोचले होते.
खासदार आणि मंत्र्यांनी सभागृहातून स्वतःचे ऑफिस चालवू नये. मंत्र्यांनी संबंधित खासदारांनी स्वतःच्या ऑफिसमध्ये येण्याची सूचना करावी. खासदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखावी असे बिर्ला यांनी याप्रकरणी म्हटले आहे. सभागृहात कामकाज सुरू असताना विविध पक्षांचे खासदार हे मंत्र्यांच्या आसनासमीप जाऊन त्यांच्या मंत्रालयाशी निगडित विषयावर चर्चा करत असल्याचे अनेकदा दिसून येते.
तत्पूर्वी कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी प्रश्नोत्तराचा तास समाप्त झाल्यावरही उत्तर देणे सुरूच ठेवल्याने लोकसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्याची घोषणा केल्याने मंत्र्यांनी आसनावर बसावे असे बिर्ला यांनी त्यांना सांगितले.