पेगॅसस प्रकरणावरुन गोंधळ सुरूच, कामकाजात व्यत्ययानंतर स्थगिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गदारोळात वाया गेल्यानंतर सोमवारी लोकसभेत दोन विधेयकांना संमती मिळाली आहे. यापैकी एक विधेयक व्यापार आणि उद्योगांच्या दृष्टीने महत्वाचे असून ते फॅक्टरिंग व्यवसायासंबंधी आहे. मात्र पेगॅसस प्रकरणी विरोधकांनी गदारोळ सुरुच ठेवल्याने कामकाज स्थगितीचे सत्रही सोमवारी कायमच राहिले. या दोन विधेयकांचा अपव्<ााद वगळता अन्य कोणतेही कामकाज संसदेच्या दोन्हीं सदनांमध्ये होऊ शकले नाही.
फॅक्टरिंग व्यवसायासंबंधीच्या कायद्यात सुधारणा सुचविणारे विधेयक लोकसभेत 14 सप्टेंबर 2020 या दिवशी सादर करण्यात आले होते. त्यानंतर ते स्थायी समितीकडे पाठविण्यात आले. स्थायी समितीने सूचनांसह ते लोकसभेला परत दिले. आता ते संमत करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या सुधारणा विधेयकाचे महत्व आपल्या लघुवक्तव्यात स्पष्ट केले.
फॅक्टरिंग व्यवसाय म्हणजे काय ?
कोणताही व्यावसायिक किंवा कोणतीही संस्थने तिची थकबाकी अन्य कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून वसूल करुन घेतल्यास त्याला फॅक्टरिंग असे म्हणतात. ही थकबाकी प्रामुख्याने वस्तू, सेवा किंवा सुविधा पुरविल्यासंबंधीची असते. अशी थकबाकी वसूल करुन देणारे व्यावसायिकही असतात. ही थकबाकी कशी चुकती करुन घ्यावी, याची नियमावली फॅक्टरिंग कायद्यात नमूद आहे. मात्र, हा जुना कायदा आता अपुरा पडत असल्याने त्यात सुधारणा करणारे विधेयक 2020 मध्येच संसदेत आणण्यात आले होते. आता ते संमत झाल्याने थकबाकी वसूल करण्याचा व्यवसाय करणाऱयांची सोय होईल. या सुधारणांची आवश्यकता होती, अशी या क्षेत्रातील अनेक प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली.
पेगॅससचा गदारोळ सुरुच
पंतप्रधान मोदी यांनी स्वतः येऊन पेगॅससवर संसदेत निवेदन दिले पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून सोमवारी पुन्हा करण्यात आली. यावर त्वरित चर्चा व्हावी असा आग्रह विरोधी पक्षांनी राज्यसभेत धरला. मात्र, यासंबंधातील स्थगन प्रस्ताव यापूर्वीच नाकारण्यात आला आहे असे राज्यसभाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी निदर्शनास आणून दिले. तरीही कामकाजात व्यत्यय सुरुच राहिला.
कामकाज स्थगित
गोंधळ वाढल्याने आणि दोन्ही सदनांमध्ये घोषणाबाजीही होऊ लागल्याने अखेर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी कामकाज सुरळीत व्हावे यासाठी विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांनी सोमवारी संध्याकाळी सहा वाजता विरोधकांबरोबर चहापान करण्यास तयार आहोत, असेही स्पष्ट केले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कामकाज स्थगित झाले.