प्रतिनिधी/ पणजी
गोवा लोकसेवा आयोगातर्फे आयोजित कनिष्ठ श्रेणी अधिकारी पदासाठी चाचणी परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणार आहेत.
आयोगातर्फे गत 29 मार्च रोजी कनिष्ठ श्रेणी अधिकारी पदासाठी संगणक आधारित नियुक्ती परीक्षा (सीबीआरटी) घेण्यात येणार होत्या. परंतु कोरोना महामारीच्या संकटामुळे आयोगाने त्या स्थगित केल्या होत्या. आता त्या परीक्षा पुन्हा घेण्याची तयारी आयोगाने चालविली आहे. त्यानुसार 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी त्या परीक्षा होणार असून त्यातून प्रमुख सीबीआरटी परीक्षेसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. 22 कनिष्ठ श्रेणी अधिकारी पदासाठी आयोगाने जानेवारी महिन्यात जाहिरात दिली होती. तिला प्रतिसाद म्हणून सुमारे 3600 अर्ज आले आहेत.
कोरोना महामारीनंतर जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सामाजिक अंतर पाळणे क्रमप्राप्त ठरल्यामुळे आयोगाने प्रमुख सीबीआरटी परीक्षेपूर्वी चाचणी परीक्षा घेण्याचे ठरविले. एका तासाच्या या चाचणी परीक्षेसाठी 60 प्रश्न विचारण्यात येणार असून त्यात सर्वसाधारण, ओबीसी/ दिव्यांग आणि एससी/एसटी यांच्यासाठी अनुक्रमे 65 टक्के, 60 टक्के आणि 55 टक्के कमीतकमी गूण अशी उत्तीर्ण टक्केवारी असेल.
प्रत्येकी 360 विद्यार्थ्यांचे 10 गट बनवून ही परीक्षा घेण्यात येईल. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील. कमीतकमी गूण टक्केवारीच्या केवळ 5 टक्के कमी गूण मिळविणाऱया उमेदवारांना दि. 28 नोव्हेंबर रोजी होणाऱया दुसऱया टप्प्यातील परीक्षेत पुन्हा संधी देण्यात येणार आहे.