प्रतिनिधी / इस्लामपूर
राज्य लोकसेवा आयोगाच्या करसहाय्यक २०१५ च्या परीक्षेत आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर बनावट खाते तयार करुन शासकीय नोकरीसाठी फसवणूक केल्या प्रकरणातील दोन आरोपींना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता, दि.२९ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा गुन्हा दि. १२ मे २०१५ ते ७ जून २०१५ च्या दरम्यान हस्लामपुरात घडला होता.
भास्कर माधव तास्के ३३, रा.वाकोडी, ता.कळमनुरी, जि.हिंगोली व इंद्रजित बाळासाहेब माने २९,रा.बहादूरवाडी, ता.वाळवा अशी आरोपींची नावे आहेत. तास्के या उमेदवारास महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे करसहाय्यक परीक्षेत अवास्तव फायदा होण्यासाठी माने या उमेदवाराने तास्के यांच्या नावाने बनावट खाते तयार केले. बनावट अर्जाच्या आधारे स्वत:च्या फायद्यासाठी तोतया उमेदवार बसवून तास्के याने आयोगाची फसवणूक केली. त्यास माने याने परीक्षा पास करण्याकरीता मदत केली. आयोगाचे संकेत स्थळावरील स्पर्धा परीक्षातंर्गत उमेदवारांना सर्व साधारण सूचना मधील सूचना क्रमांक १.३.१, १.३.२ व ५.१२.२ चे उल्लंघन करुन संगणमताने बनावट खाते तयार करुन खोटी माहिती देवून या दोघांनी आयोगाची फसवणूक केली.
याप्रकरणी दि.१ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नोकरी उपसचिव सुनिल हरिश्चंद्र अवताडे(५०,रा.खारघर, नवीमुंबई) यांनी हस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली होती. या दोघांविरुध्द भा.द.वि.क. ४२०, ४६७, ४६८ सह महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ युनिर्व्हसिटी बोर्ड अॅण्ड ऑदर स्पेसिफाईड हक्झामिशन अॅक्ट १९८२ चे कलम ७, ८ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी)(डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील आरोपी तास्के व माने हे तेव्हा पासून पोलीसांच्या हाती लागले नव्हते. या दोघांना पोलीसांनी सोमवारी अटक केली.