पंचवाडी येथील कार्यक्रमात मुख्य़मंत्र्यांचे आवहन
प्रतिनिधी /शिरोडा
गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण जनसंपर्क अभियान राबवले असून जनतेला सरकारच्या विविध योजनांसाठी प्रोत्साहन देणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पंचवाडी पंचायतीतर्फे नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्थानिक आमदार सुभाष शिरोडकर, बोरी जिल्हा पंचायत सदस्य दीपक बोरकर, पंचवाडीचे सरपंच क्रिस्तेंव डिकॉस्ता, उपसरपंच प्रिस्ता फर्नांडिस, पंचसदस्य निता घाडी, अँथनी डिकॉस्ता, अमीर नाईक, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, प्रभारी ऍड. नरेंद्र सावईकर, भाजपाच्या पदाधिकारी परिमल सामंत, अवधूत नाईक आदी यांची उपस्थिती होती. गोवा स्वयंपूर्णतेच्या मार्गावर असून ही नुकतीच सुरुवात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
भाजपा सरकारच्या काळात सर्व स्तरातील घटकांना सामावून घेणाऱया विविध कल्याणकारी योजना अस्तित्त्वात आल्या. साधन सुविधांवर विशेष भर देण्यात आला, असे सांगून पंचवाडी भागातील वीज समस्या व मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शिरोडा मतदारसंघातील विविध विकासकामाबरोबरच आगामी काळात प्रलंबित असलेल्या नवीन बोरी पुलाचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संपर्क दौऱयाच्यावेळी अंबळाय पंचवाडी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाजवळील रस्ता तसेच जीतोन माठ ते मुख्य रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला. पंचवाडी येथील न्यू इंग्लीश हायस्कूलच्या बालोद्यानाचे उद्घाटनही करण्यात आले. आमदार सुभाष शिरोडकर म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रत्येक योजना व विकासाचा प्रकल्प मिशन म्हणून हाती घेतात. विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. विकासकाचे प्रकल्प उभारताना गोव्यातील निसर्गसंपत्तीचाही समातोल राखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरपंच क्रिस्तेंव डिकोस्ता यांनी आपल्या स्वागतपर भाषणात पंचवाडी पंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱया विकासकामांची माहिती दिली. तसेच येथील काही समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईदत्त कामत यांनी तर ऍन्थोनी डिकॉस्ता यांनी आभार मानले.