हातांवर काढून घेत आहेत बुलडोझर टॅटू
उत्तरप्रदेश निवडणुकीत गुन्हेगार आणि माफियांच्या विरोधात ‘बुलडोझर’ चालविण्याचा नारा देण्यात आला होता. या बुलडोझरला योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या प्रचारसभांमध्ये मोठे स्थान दिले होते. त्यांच्या समर्थकांनी त्यांना ‘बुलडोझर बाबा’ हे नवे नाव दिले होते. आता बहुमताने सत्तेवर परतलेले योगी आदित्यनाथ स्वतः हिट झालेच, त्याचबरोबर त्यांचा बुलडोझरही सुपरहिट होतोय. बुलडोझर टॅटू काढून घेण्याचे प्रकार तेथे वाढले आहेत.
उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजप विजयी झाल्यावर अनेक जण स्वतःच्या हातांवर बुलडोझरचा टॅटू काढून घेत आहेत. एवढेच नव्हे तर बुलडोझर बाबा असेही गोंदवून घेत आहेत. उत्तरप्रदेशच्या अनेक टॅटू शॉपमध्ये हा प्रकार दिसून येतोय. विशेषकरून वाराणसी या भाजपच्या बालेकिल्ल्यात हे प्रमाण अधिक आहे. योगींनी मागील कार्यकाळात अनेक माफियांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालवून अवैध कब्जा हटविण्याचे कार्य केले होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीत बम्पर विजय मिळविल्यापासून लोक हातांवर टॅटू काढून घेत आहेत. लोकांमध्ये बुलडोझर बाबाची क्रेझ वाढली असल्याचे टॅटू आर्टिस्ट सुमितने म्हटले आहे. तसे पाहिल्यास आतापर्यंत ही क्रेझ पंतप्रधान मोदींसाठी दिसून येत होते. पहिल्यांदाच मोदींच्या व्यतिरिक्त अन्य राजकीय नेत्यावरून जनता इतकी प्रभावित झाल्याचे दिसून आले आहे.