इटलीत विचित्र संकट – महिलांचे केस ओढण्याचाही प्रकार
इटलीची राजधानी रोममध्ये अलिकडेच एक वेगळे दृश्य दिसून आले. तेथे पाऊस पडत नव्हता. तसेच कडाक्याचे ऊन देखील पडले नव्हते. तरीही शेकडो लोक छत्री घेऊन फिरताना दिसून आले. इतकेच नाही तर अनेक लोकंनी तर जॅकेट किंवा टी-शर्टने स्वतःचे डोकं झाकून घेतले होते. काही लोकांच्या हातात काठी होती.
हा कुठलाही फॅन्सी ड्रेस शोचा हिस्सा नव्हता तर लोक कावळय़ांच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी असे करत होते. रोममध्ये सध्या कावळय़ांची संख्या वेगाने वाढली असून कावळे आता झुंडीत येऊन लोकांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमुळे अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचार करवून घ्यावे लागले आहेत. 66 वर्षीय पाओला देखील अशाच लोकांपैकी एक आहे. कावळय़ांनी तिचे केस खेचण्यासह डोक्यात चोचीने वार केला. तसेच पंज्यांनी कपडेही फाडून टाकले आहेत.
या कावळय़ांच्या भीतीने आता वृद्ध लोक घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. रोममधील लोक यापूर्वीच शिकारी पक्षी सी-लच्या समस्येला तोंड देत आहेत. सध्याच्या ऋतूत उत्तर युरोपमध्ये मोठय़ा संख्येत सी-गल पोहोचतात. सध्या शहरामध्ये सुमारे एक लाख सी-गल आहेत.
रोममध्ये दरवर्षी वसंत ऋतूत कावळय़ांची संख्या वेगाने वाढत असते. यादरम्यान ते माणसांना सर्वात मोठा धोका मानू लागतात आणि स्वतःच्या पिल्ल्यांना वाचविण्यासाठी लोकांवर हल्ले करू लागतात. अनेकदा त्यांची दहशत वाढल्याने राजधानीत कावळय़ांचे प्रमाण अधिक असलेल्या भागात ये-जा करणेच लोक टाळतात.