उत्तर कर्नाटक रेल्वे विकास संघाची पंतप्रधानांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकापूर-धारवाड व्हाया रामदुर्ग-सौंदत्ती या रेल्वे मार्गाचे 2016 साली सर्वेक्षण करण्यात आले होते. या 95 कि. मी. च्या रेल्वे मार्गामुळे सौंदत्ती या तिर्थक्षेत्राचा विकास होणार आहे. त्यामुळे या मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी द्यावी, अशी मागणी उत्तर कर्नाटक रेल्वे विकास संघाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भक्त सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनाला येतात. त्यामुळे या तिर्थक्षेत्राला रेल्वे मार्गाने जोडणे गरजेचे आहे. लोकापूर ते धारवाड या रेल्वे मार्गामध्ये सौंदत्ती या गावाचा समावेश होतो. त्यामुळे या मार्गाला मंजुरी मिळाल्यास या तिर्थक्षेत्राचाही विकास होणार आहे. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर हे मंत्रीपद राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी किंवा चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना द्यावे, अशीही मागणी या निवेदनाद्वारे अध्यक्ष गुरूसिद्धप्पा तोग्गी यांनी केली आहे.