ऑनलाईन टीम / मुंबई :
पाटणा एक्सप्रेसच्या लोकोपायलटने रेल्वे रुळाला तडा गेल्याचे लक्षात येताच वेळीच प्रसंगावधान राखत एक्सप्रेस थांबवली. त्यामुळे मोठा रेल्वे अपघात टळला.
कल्याणजवळ खडवली-टिटवाळा दरम्यान अप मार्गावरील रेल्वे रुळाला तडा केला होता. लोकोपायलट एस. मुरुगन यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबून रेल्वे थांबविली. त्याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यानंतर रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
रुळाला तडा गेल्याने आज सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. रुळाचे काम झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मुरुगन यांच्या कामगिरीबद्दल त्यांचा रेल्वे प्रशासनाकडून गौरव करण्यात येणार आहे.