प्रतिनिधी / वास्को
लोखंडी पाईपने नारळ काढण्याचा प्रयत्न वास्कोतील एका युवकाच्या अंगलट आला. त्या लोखंडी पाईपचा स्पर्श वीज वाहिनीला झाल्याने वीजेच्या झटक्याने त्याला मृत्यू आला. मयत युवकाचे नाव सर्वेश सावळो नाईक(29) असे आहे. ही घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेस्तावाडा वास्को भागात राहणारा सर्वेश आपल्या काही मित्रांसमवेत मेस्तावाडा जवळच असलेल्या रेल्वे मार्गाच्याशेजारील एका माडाचे नारळ काढण्याचा प्रयत्न करीत होते. हे नारळ काढण्यासाठी त्यांनी एका लांब लोखंडी पाईपचा आधार घेतला होता. मात्र, हा प्रयत्न त्या युवकांपैकी सर्वेशच्या अंगलट आला. नारळ काढताना सर्वेशला तो पाईप झेपेनासा झाला व तो माडाशेजारीच असलेल्या विद्युतभारीत वीज वाहिनीला लागला. त्यामुळे त्याला वीजेचा झटका बसून तो जागीच ठार झाला. त्याच्या मित्रांनी ही माहिती त्याच्या घरी कळवल्यानंतर वाडय़ावर घटनेची माहिती पसरली. या घटनेची नोंद वास्को पोलीस स्थानकात झालेली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मयताचा मृतदेह मडगावच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार मयत सर्वेश हा कुटुंबातील एकुलता मुलगा होता. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.