माळमारुती पोलिसांची कारवाई, एक टन लोखंड जप्त
बांधकामासाठी आणलेले लोखंड चोरी केल्याच्या आरोपावरुन माळमारुती पोलिसांनी के.के.कोप्प (ता. बेळगाव) येथील चौघा जणांना अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी कणबर्गी येथे लोखंडाची चोरी झाली होती. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी या चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे.
संतोष प्रकाश मेदार (वय 27), राकेश सोमाप्पा शिंग्यानकोप्प (वय 20), संजीव चंद्रया गणाचारी (वय 20), प्रशांत सिध्दराम गाणगी (वय 20, सर्व रा. के. के. कोप्प, ता. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. संतोष हा पेंडाल कंत्राटदार असून उर्वरित तिघे जण शेती करतात.
सोमवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन सर्व चौघा जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांच्यावर भा.दं.वि. 379 कलमान्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने आणखी कोठे चोरी केली आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कणबर्गी येथे नव्या घराच्या बांधकामासाठी आणलेले 2 टन लोखंडाची चोरी झाली होती. संतोष व त्याचे साथीदार पेंडाल घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी बांधकामावर पडलेले लोखंड त्यांनी चोरले होते. सोमवारी 1 टन लोखंड जप्त करण्यात आले आहे.