चिपळूण-नोसील गुणदेफाटा स्वतंत्र बससेवा,
प्रतिनिधी/ चिपळूण
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी एस. टी. बस सोडण्याची मागणी उद्योजक संघटनेने केली होती. यानुसार येथील मध्यवर्ती बसस्थानकातून गुणदे फाटापर्यंत 27 मेपासून बसफेऱया सोडण्यात येणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एस. टी. बससेवा बंद करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये या औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना परवानगी देण्यात आलेली असली तरी बसेसची व्यवस्था नसल्याने असंख्य कामगारांना कारखान्यात जाता येत नव्हते. काही कारखान्यांनी कामगारांसाठी स्वत:हून बसेससह अन्य वाहनांची व्यवस्था केली होती. मात्र लहान कारखान्यांतील कामगारांची गैरसोय होत होती. यामुळे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी बस सुरू करण्यासंदर्भात चिपळूण आगाराकडे पाठपुरावा केला होता.
यानुसार बुधवारपासून दररोज सकाळी 7 वाजता व दुपारी 2 वाजता येथील मध्यवर्ती बसस्थानकातून चिंचनाकामार्गे स्वतंत्र नोसील गुणदे फाटा अशा बसफेऱया सोडल्या जाणार असल्याचे येथील आगारातून कळवण्यात आल्याचे डॉ. पटवर्धन यांनी कळवले आहे.