लोणंद / प्रतिनिधी
हिंदुस्थान पेट्रोलिअम कंपनीची पेट्रोलची पाईप लाईन फोडून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा लोणंद पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून पिंपरी चिंचवड येथून सात जणांना अटक केली.
हिंदुस्थान पेट्रोलिअम कंपनीची पेट्रोलच्या पाईप लाईनला छिद्र पाडून पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न फलटण तालुक्यातील सासवड येथे घडली. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी जवळपास दोन हजार लिटर पेट्रोल शेजारच्या ज्वारीच्या शेतात पसरले. तसेच जमीनीत मुरलेले पेट्रोल आजुबाजुचे विहीरीत उतरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे ही बाब उघडकीस आली. यावेळी बाजारभाव मुल्यानुसार 1,90,000 रुपयांचे पेट्रोल गेल्याचे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड कंपनीचे सहाय्यक प्रबंधक विकी सत्यवान पिसे यांनी सांगितले.
याप्रकरणी अनित हरीशंकर पाठक वय 32 वर्षे रा.मुळ गाव पिंडराई पटखान जि.वाराणसी राज्य उत्तरप्रदेश सध्या रा . वाल्हेकरवाडी चिंचवड, बाळु आण्णा चौगुले वय 42 वर्षे रा.रामनगर चिंचवड पुणे, मोतीराम शंकर पवार वय 20 वर्षे रा.गवळीमाथा भोसरी पुणे, इस्माईल पिरमहंमद शेख वय 62 वर्षे रा.डीमार्ट शेजारी पिपंरी पुणे, शाम शिवाजी कानडी वय 50 वर्षे रा . वाल्हेकरवाडी चिंचवड, दत्तात्रय सोपान लोखंडे वय 41 वर्षे रा.सासवड ता.फलटण जि.सातार आणि नामदेव ज्ञानदेव जाधव वय 28 वर्षे रा . दालवडी ता . फलटण जि.सातारा या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सहकार्याने सातारा पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
संबंधित आरोपींनी अशाच प्रकारचे गुन्हे राज्यातील इतरत्रही केल्याचे तपासातून पुढे आले आहे. सातारचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल आणि अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेवरून उपविभागीय पोलिस अधिकारी, फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल के.वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने आणि पोलिस पथकाने ही कारवाई केली.