प्रतिनिधी /म्हापसा
म्हापशाच्या विकासाबाबत बोलणारे मायकल लोबो हे कोण? ते म्हापशातून निवडणूक लढविणार आहेत का? असा प्रतिसवाल करून लोबोनी येथील बसस्थानक कामातील घोटाळा सिद्ध करून दाखवावा, असे आवाहन म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना केले.
म्हापसा बसस्थानक उभारण्यात 3 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप मायकल लोबो यांनी केला आहे तो सिद्ध करुन दाखवावा. बस स्थानकातील पेव्हर्स वरखाली झाल्याने ते काढून परत घातले. विरोधकांना काय पाहिजे ते बोलू द्या. आम्ही पूर्वनियोजित उत्कृष्ट प्रकारे नवीन बसस्थानक बांधण्याचा आराखडा बनविला आहे. टप्प्या टप्प्याने चारही टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत, असे जोशुआ यांनी सांगितले.
मायकल लोबोंच्या काँग्रेस प्रवेशाने आपल्यावर काहीच फरक पडणार नाही. उलट गेल्यावेळीही त्यांनी आपल्याविरोधात काम केले होते. म्हापसावासिय आमच्याबरोबर आहेत. लोबोनी आपल्या मतदारसंघात काय चालले ते पहावे. बार्देशात 6 जागा जिंकण्याचे स्वप्न मायकल लोबो पाहत आहे मात्र कळंगूटच त्यांच्या हातून निसटत आहे, असे जोशुआ म्हणाले.