प्रतिनिधी / वैभववाडी:
लोरे नं. 1 सतीचा माळ येथील सतीश प्रकाश कासले (40) यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यांना कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान, सर्दी खोकल्याचे औषध घेत असताना चुकून विषारी द्रव्य प्राशन केल्याचे कासले यांनी पोलीस जबाबात म्हटले आहे. याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सतीश कासले हे रिक्षा चालक आहेत. शुक्रवारी त्यांनी विषारी द्रव प्राशन केल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती वैभववाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात कासले यांचा जबाब घेतला. आपण सर्दी-खोकल्याचे औषध घेत असताना चुकून रॅटकील औषध प्राशन केल्याचे कासले यांनी पोलिसांना सांगितले. कासले यांची प्रकृती स्थिर आहे.