रस्त्यावर उतरण्याचा पंच अजय लोलयेकर यांचा इशारा
प्रतिनिधी / काणकोण
लोलये पंचायतीमधील गाळ या वाडय़ावर पिण्याच्या पाण्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झालेली असून याबाबतीत पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास अभियंते फोन उचलत नाहीत. खात्याकडे टँकर चालवायला चालक नसल्याचे कारण पुढे केल्यानंतर आपण चालकाची व्यवस्था केली. तरीही पाण्याचा टँकर पाठविला जात नाही. आता अती झाले असून रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असा इशारा लोलयेचे माजी सरपंच असलेले स्थानिक पंच अजय लोलयेकर यांनी दिला आहे.
एप्रिल आ मे या दोन महिन्यांतच या वाडय़ावर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असते. या दोन महिन्यांत जर खात्याकडून पाण्याची व्यवस्था होत नसेल, तर खात्याचे अधिकारी काय करतात, असा सवाल लोलयेकर यांनी केला. आपण उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे कट्टर समर्थक आहोत. फर्नांडिस हे सरकार पक्षाचे आमदार आहेत. त्यांची नाचक्की होऊ नये यासाठी आपण आतापर्यंत गप्प बसलो. 2 मे रोजी आपण खात्याला या वाडय़ावर टँकर पाठविण्याची विनंती केली होती. 9 मे उजाडला, तरी टँकर पाठविला गेला नाही, असे लोलयेकर यांनी सांगितले.
यासंदर्भात विचारले, तर टँकरचालक नाही अशी थातूरमातूर कारणे पुढे केली जातात. आपण स्वखर्चाने चालकाची व्यवस्था केली, तरी देखील मूलभूत गरज असलेल्या पाण्याची सोय केली जात नाही. याचा अर्थ एक तर हे अभियंते मुजोर झालेले आहेत किंवा साहाय्यक अभियंत्याला त्यांनी खुटय़ाला टांगून ठेवले आहे असे समजायचे काय, असा सवाल लोलयेकर यांनी केला. यापूर्वी लोलयेचे माजी सरपंच भूषण प्रभुगावकर यांनी पिण्याच्या पाण्यासाठी उपोषणाला बसून आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला होता. त्याची आठवण करून देताना, आपण आपल्या वॉर्डातील लोकांसाठी उपोषणाला बसणार नाही, तर रस्त्यावर येणार, असा इशारा लोलयेकर यांनी दिला.